कोल्हापूर : पन्हाळा गडासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागानं पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील तालीम संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पैलवान गावाकडे रवाना झाले आहेत. कोरोनामुळे अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. तसंच अंबाबाई मंदिरातील लाडू प्रसाद उत्पादन बंद करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजीपाल्याची वाहतूक देखील थांबविण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातला ५०० टन भाजीपाला पडून आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर शहरात खबरदारीचा उपाय म्हणून ४ ट्रॅक्टरच्या साहाय्यानं औषध फवारणी करण्यात आली आहे.


सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करत आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना दर्शन बंद ठेवण्याची विनंती केली होती. कोरोना अजून पसरू नये म्हणून साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.


सोमवारी प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिरही बंद ठेवण्य़ाचा निर्णय सिद्धिविनायक ट्रस्टने घेतला होता.