Corona : महाराष्ट्रात कोरोना टेस्ट करणाऱ्या प्रत्येकी 100 जणांपैकी इतके जण पॉझिटिव्ह
राज्यातील कोरोना संक्रमणाचा झपाट्याने प्रसार
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती अशी बनली आहे की कोरोना चाचणी घेतलेल्या प्रत्येक 100 पैकी 23 लोक आता पॉझिटिव्ह येत आहेत. हा राज्यातील कोरोना संक्रमणाचा झपाट्याने होणारा प्रसार दर्शवत आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रेट 23 टक्के झाला आहे, जो देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रानंतर पंजाब दुसर्या स्थानावर आहे. पंजाबमध्ये पॉझिटिव्ह रेट 8.82 टक्के आहे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 2 टक्के, मध्य प्रदेशात 7.82 टक्के, तामिळनाडूमध्ये 2.50 टक्के, कर्नाटकात 2.45 टक्के आहे. गुजरात आणि दिल्लीमध्ये 2.04 टक्के रुग्ण वाढीचा दर आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या मते, देशभरातील आठवड्याची सरासरी पाहिली तर पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण 5.65 टक्के आहे. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामुळे कोरोना चाचणीनंतर देशात पॉझिटिव्ह रेट वाढत आहे, देशातील इतर राज्यांत संसर्ग या राज्यांच्या तुलनेत कमी आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, महाराष्ट्रात 3,37,928 सक्रिय रुग्ण आहेत. फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात दिवसाला सरासरी 3,000 नवीन रुग्णांची वाढ दिसत होती ती आता दिवसाला 34,000 वर गेली आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात एकाच दिवसात 32 मृत्यू झाले होते, ही संख्या आता 118 वर पोहचली आहे.
देशात एकूण प्रकरणांची संख्या 5,40,720 वर गेली आहे. हे 4% पेक्षा जास्त आहे. मृतांची संख्या 1,62,000 आहे. रिकव्हरी रेट 94% आहे. सर्वाधिक सक्रिय प्रकरणे असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.