CORONA: पुणेकरांच्या चिंता वाढल्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून धक्कादायक माहिती उघड
देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. देशभरातील 19 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ होत आहे आणि त्यापैकी 15 हे केवळ महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व 19 जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोना संसर्ग सातत्याने वाढत आहे. सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत देशभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील सर्वाधिक रुग्णांची वाढ असलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिले सात जिल्हे हे महाराष्ट्रात आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूर, कर्नाटकमधील बेंगळुरु, तामिळनाडूमधील चेन्नई आणि पंजाबमधील जालंधर वगळता १९ जिल्ह्यांपैकी इतर जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये गेल्या दहा दिवसांत दररोज सरासरी १००० रुग्ण वाढत आहेत.
पुण्यात गेल्या 10 दिवसात एकूण 26,218 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर नागपुरात ही संख्या 20,104 आहे. तिसरे स्थान मुंबईचे आहे, जिथे 10 दिवसांत 11,859 कोविड रुग्णांची वाढ झाली आहे. चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा आहे, ठाण्यात 10,914 रुग्ण वाढले आहेत. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव जिल्हे आहेत. गेल्या एका आठवड्यात येथे अनुक्रमे 9,024, 6,652 आणि 6,598 रुग्णांची वाढ झाली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हा आठव्या क्रमांकावर असून, गेल्या दहा दिवसांत येथे 5,238 कोरोना रुग्णांची नोंद झाली आली. नवव्या क्रमांकावर कर्नाटकातील बंगळुरू आहे. जेथे 5,047 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील अमरावती व अहमदनगर दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर आहेत, जिथे अनुक्रमे 4,250 आणि 3,962 रुग्ण वाढले आहेत.
तामिळनाडूतील चेन्नई १२ व्या स्थानावर आहे. येथे 3,811 रुग्णांची नोंद झाली आहे. 13 व्या स्थानावर मुंबई उपनगरे आहेत. जेथे 3,355 कोरोना रुग्ण वाढले आहेत. 14, 15 आणि 16 व्या स्थानावर यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्हे आहेत. त्यानंतर नांदेड आणि वर्धा जिल्ह्याचा क्रमांक आहे. येथे अनुक्रमे 3,326, 3,299, 3,185, 3,146 आणि 2,431 रुग्णांची नोंद झाली आहे. 19 व्या स्थानावर पंजाबमधील जालंधर जिल्हा आहे. येथे 10 दिवसात 2,424 रुग्ण वाढले आहेत.