मुंबई : कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलावर नियंत्रण आणण्यासाठी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कमी किमतीत माक्स. आता कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविरची किंमत कमी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे. 


राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खासगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत, अशी माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 


राज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत.


इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.