मुंबई : रत्नागिरी जिह्यात कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणालाही रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून आणि राज्यातून येण्यास बंदी आहे. जर प्रवास करायचा असेल तर ई-पास घेऊन प्रवास करता येतो. मात्र, असे असताना कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या (NRMU) काही पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवेश केला. ते एवढ्यावरच न थांबता कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात काही अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. त्यानंतर चार दिवस मान्यता प्राप्त संघटनेचा पदाधिकारी हा रत्नागिरीत ठाण मांडून होता. तरीही कोणत्याही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला याची माहितीही दिलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याआधी रेल्वेच्या एका कर्माचाऱ्याचा  मृत्यू झाला होता. तसेच कोकण रेल्वेचा आणखी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यावेळी त्यांच्यासंपर्कात आलेल्या जवळपास ५२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. कोविड-१९चा धोका असताना सुध्दा दुसऱ्या राज्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाला का देण्यात आली नाही,  याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.


कारवार येथून तीन राज्यातून प्रवास करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे (एनआरएमयु) कार्याध्यक्ष कृष्णकुमार लक्ष्मण शेट (krishankumar Shet) रत्नागिरी कार्यालयात आले होते. त्यांनी रत्नागिरीत काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच सिंधुदुर्गातून आलेले दोन पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. या तिघांबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि या तिघांनी स्वत: रत्नाीगिरी जिल्हा प्रशासनाला प्रवासाची माहिती दिलेली नव्हती. एआरएमयुचे पदाधिकारी कार्याध्यक्ष कृष्णकुमार लक्ष्मण शेट हे चार दिवस रत्नागिरीत उपस्थित होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा कोकण रेल्वेने प्रवास करत कारवार येथे माघारी गेले.



रत्नागिरीत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक


२२  जून २०२० रोजी आरआरएम कार्यालायत कोकण रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतली. ही बैठक सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होती.  या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नॅशनल रेल्वे मजदूर युनियन संघटनेचे दोन पदाधिकारीही उपस्थित होते. यात संजय खरीवले (कणकवली), रमाकांत नाडकर्णी (कुडाळ) यांचा समावेश होता. तसेच स्थानिक पदाधिकारीही सहभागी झाले होते. दरम्यान, ही बैठक अधिकृत असली तरी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. या बैठकीला दुसऱ्या जिल्ह्यातून आणि राज्यातून आलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेली नाही. दरम्यान, रेल्वेची मान्यता प्राप्त संघटना एनआरएमचे कार्याध्यक्ष कृष्णकुमार लक्ष्मण शेट त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा रेल्वेनेच प्रवास केला. प्रवास करण्याचा ई-पास नसताना त्यांना रेल्वेमधून पुन्हा प्रवासाची संधी कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


चौकशी करण्याची मागणी 


दरम्यान, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. असे असताना एनआरएमचे कार्याध्यक्ष कृष्णकुमार लक्ष्मण शेट यांनी कारवार येथून प्रवास करताना सेवा सिंधु अॅपवर नोंदणी करण्याची आवश्यता होती. त्यांनी याचीही काळजी घेतलेली नाही. त्यांनी रेल्वेतून अनधिकृतपणे प्रवास केल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


होनावर येथे केले क्वारंटाईन


कृष्णकुमार लक्ष्मण शेट हे रत्नागिरीतून चार दिवसानंतर पुन्हा कारवारकडे प्रवास केला. यावेळी त्यांची तेथील रेल्वे स्टेशनवर रत्नाीगिरीतून आलेल्या प्रवासाची नोंद करण्यात आलेली नाही. त्यांचे हेल्थ चेकअपही करण्यात आलेले नाही. ते गुरुवारी कारवारला पोहोचले. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना तेथील प्रशासनाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्या घराजवळील हॉटेल येथे आता क्वारंटाईन केले. तोपर्यंत ते घरीच होते. गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस घरी होते. शनिवारी रात्री ८.३०. होनावर येथील एका हॉटेलवर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरीत त्यांना क्वारंटाईन करण्याची गरज असताना येथील रेल्वेच्या प्रशासनाने याची दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून ते भीतीच्या सावटाखाली आहेत.