मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजीचा सूर, मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय याबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासन त्यांच्या स्तरावर वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि आदेश काढत आहेत. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसारही राज्यात गोष्टी होत नसल्याची बाब अनेक मंत्र्यांनी बैठकीत समोर आणली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं सुरू ठेवण्याबाबत मुख्य सचिवांनी आदेश काढला, पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर वेगळेच निर्णय घेत आहेत. कोणी काही तासांसाठी दुकानं सुरू ठेवतो, तर कोण एक दिवसाआड, यामुळे राज्यात गोंधळ उडत असल्याचं मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन परस्पर ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.