अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भविष्य काळात कोरोनाबरोबरच वेगवेगळ्या आजारांचा धोका उद्भवण्याचा इशारा राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिला आहे. आपल्यासमोर बिकट आव्हान असल्याचंही डॉक्टर ओक म्हणाले. पुढच्या काही दिवसांमध्ये कोरोना प्लस डेंग्यू, कोरोना प्लस मलेरिया असे आजार वाढतील, अशी भीती डॉक्टर ओक यांनी वर्तवली आहे. कोरोनाची नवी लक्षण आढळली आहेत, यामध्ये रुग्णाच्या जीभेची चव जाते आणि नाकाला वास येत नाही, असंही संजय ओक म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सुरुवातीला आपण व्हॅन्टिलेटरच्या मागे गेलो, पण आता ते करण्यापेक्षा मास्कद्वारे ऑक्सिजन द्यायला आपण सुरु केलं. आजारावर उपचार करण्याची प्रक्रिया आपण बदलली. कोरोना जाणार नाही, पण त्याची तीव्रता कमी राहिल. असं असलं तरी इतर संसर्गजन्य आजारात कोरोना पहिल्या क्रमांकावर राहिल,' अशी प्रतिक्रिया डॉक्टर संजय ओक यांनी दिली.


मुंबई कोरोना कडेलोटाच्या टोकावर?, टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात...


'आपल्याला अजून बराच पुढचा पल्ला गाठायचा आहे. युरोप-अमेरिकेने ज्या चुका केल्या, त्या आपण केल्या नाहीत. नागरिकांनी लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी करणं यातच आजारावर मात करण्याचा मार्ग आहे. वुहान ७२ दिवसांनी उघडलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिंगापूरसारख्या देशांवर आधी व्यवहार सुरू केल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली, त्यामुळे आपणही स्लो गेलं पाहिजे. मद्यविक्रीची दुकानं बंद ठेवली पाहिजेत. अमेरिका आणि युरोप म्हणजे सर्वोत्तम हे कोरोनामुळे मोडित निघालं,' असं वक्तव्य डॉक्टर संजय ओक यांनी केलं.


कोरोनाबाबत संशोधकांचा नवा निष्कर्ष; औषध सापडेपर्यंत 'हा' एकमेव पर्याय


आत्तापर्यंत आरोग्य यंत्रणेला धन पुरवठा केलेला नाही. अमेरिकेमध्ये जीडीपीच्या १७-१८ टक्के खर्च आरोग्यावर होतो. आपण ७ ते ८ टक्क्यांपर्यंत पुढच्या काळात खर्च केला पाहिजे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर आपण एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या धर्तीवर आरोग्य प्राधिकरण तयार केलं पाहिजे. स्वतंत्र आणि लालफितीचा अडथळा नसलेलं आरोग्य प्राधिकरण निर्माण करण्याची गरज आहे, असं मत डॉक्टर ओक यांनी मांडलं. तसंच पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी ग्रीन झोनमधील डॉक्टर आणि यंत्रणा आली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.