नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण डिसेंबर महिन्यात समोर आला होता. सामान्य तापाच्या रुपात पसरणाऱ्या या व्हायरसने आता भयंकर साथीच्या आजाराचं रुप धारण केलं आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये अनेक देशांमध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनामुळे मृतांच्या संख्येतही सतत वाढ होत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध किंवा लस सापडली नाही. जगभरातील अनेक संशोधक या व्हायरसवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पाच महिन्यांनंतरही यावर लस निर्माण होत होत नसल्याने शास्त्रज्ञ, एका नवीन निष्कर्षावर पोहचले आहेत. आता माणसांना या विषाणूसह जगण्याची सवय करुन घ्यावी लागेल असं संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे.
जगभरातील अनेक कंपन्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेक ऍन्टी-फ्लू लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 90हून अधिक संस्था आणि कंपन्या कोरोना व्हायरसवर लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, क्लिनिकल चाचण्या पूर्ण न केल्यामुळे, या लसींचे कोणतेही निकाल समोर आलेले नाहीत.
ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, आता आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवयच करावी लागेल, असं सांगितलंय. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक डॉक्टर आणि संशोधकांनी येणाऱ्या काळात कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागू शकत असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणं हा त्यावरील एकमेव उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, जगभरात एड्स आणि डेंग्यू या रोगांवरही अद्याप कोणताही ठोस उपाय नाही. या आजारांवर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक लस तयार केल्या आहेत. परंतु या दोन्ही आजारांची नेमकी लस तयार होऊ शकली नाही. गेल्या 40 वर्षात एड्समुळे जवळपास 3.20 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
तर डेंग्यूमुळे जगभरात दरवर्षी जवळपास 4 लाख लोक दगावले जात असून यावर अद्याप कोणताही ठोस उपाय किंवा उपचार आढळला नाही.