२८ जूनपासून राज्यातले सलून, जीम सुरू होणार
२८ जूनपासून राज्यातले सलून आणि जीम सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : २८ जूनपासून राज्यातले सलून आणि जीम सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून आणि जीम बंद ठेवण्यात आली होती. राज्यात २० मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता.
२८ जूनपासून सलून सुरू होणार असले तरी सध्या फक्त केस कापण्याचीच परवानगी असेल, दाढी करण्याची परवानगी सध्या नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणाऱ्या दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असेल.
सलून आणि जीममधून मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका लक्षात घेता, राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना सलून आणि जीमला दिलासा दिला नव्हता. गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने सलून पुन्हा सुरु करायला परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली होती. यानंतर आता राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.