नागपूर : आता शहरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. हा जनता कर्फ्यू ३०  सप्टेंबरपर्यंत असणार आहे. जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री ९.३० ते सोमवारी  सकाळी ७.३० वाजतापर्यंत नागपूर शहरात जनता कर्फ्यूचे पालन करा, असे आवाहन महापौर यांनी केले आहे. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असून बाधितांचा आकडा ५७  हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूही १७०० पेक्षा अधिक झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. लॉकडाउन कोरोनावरील उपाय नाही आणि सध्या प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन जबाबदारीने  वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौरांनी केलेय. 



मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभा कक्षात जनप्रतिनिधींसोबतच्या बैठकीत महापौरांनी  ही घोषणा केली.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात  जनता कर्फ्यू लागू करावा अशी बहुतांश उपस्थित लोकप्रतिनिधींनी मागणी केली. त्यास अनुसरुन महापौरांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले. शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख हा चिंताजनक असला तरी मनपाद्वारे त्यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याचे कार्य प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात अनेक सुविधा आज मनपामध्ये वाढविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सुविधांमध्येही भर पडली आहे, असे सांगतानाच महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या लॉकडाऊन न लावण्यासंदर्भातील भूमिकेचे समर्थनही केले. 


लॉकडाऊनचा निर्णय  राज्यशासनाचा आहे. मात्र कोव्हिड संक्रमणाची जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून त्यासाठी शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका सर्वच जनप्रतिनिधींनी यावेळी मांडली. शहरातील उपस्थिती आमदार आणि इतर जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून महापौर
संदीप जोशी यांनी येत्या शुक्रवारी ते सोमवारी नागरिकांनी काटेकोरपणे ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे, असे अवाहन केले. यानंतर पुढील शनिवारी आणि रविवारी म्हणजे २६ आणि २८ सप्टेंबरला सुद्धा याच प्रकारचे ‘जनता कर्फ्यू’ चे पालन करावे. त्यानंतर पुढे पुन्हा एकदा सर्व जनप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी म्हणाले.


‘जनता कर्फ्यू’च्या काळात औषधी दुकाने व्यतिरिक्त कोणतिही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शहरातील व्यापारी वर्गानेसुध्दा स्वयंस्फूर्तीने त्यांची दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेऊन या मोहिमेस सहकार्य कारावे, असेही आवाहन केले आहे.