मुंबई : Coronavirus कोरोनाचा  विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही सध्याच्या घडीची अत्यंत दिलासादायक बाब समोर येत आहे. 
आतापर्यंत कोरोनातून सावरलेल्या एकूण ७२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून त्यात २८१ महिलांचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झालेल्या या रुग्णांमध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. यातही लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं असल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची आहे. ज्यामध्ये ३७४ रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. कोरोनाचं संकट बळावतानाच राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे हे नाकारता येणार नाही. 


 


२३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीसाठी निगेटिव्ह आले, तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहे.