पुणे : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड सिटीतील दोन शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या दोन शाळा तीन दिवस बंद राहणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरता हे पाऊल शाळा व्यवस्थापनानं उचलले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध मंगळवारी मुंबई महापालिकेनं घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून त्या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे मेडीकल रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे. 


पुण्यातील कुटुंब एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसह दुबईला फिरायला गेले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेल्यांचाही शोध घेण्यात आला. यापैकी सहा जण मुंबईतले असल्याचे समोर आल्याने त्यांनाही तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुबईला गेलेले कुटुंब भारतात परतल्यानंतर ते टॅक्सीने पुण्यात गेले. ज्या टॅक्सीने गेले त्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची बाधा झाली.