दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींच्या कळपाचा मुक्तपणे विहार
पशुपक्षी, वन्यप्राणी स्वच्छंदपणे बागडत आहेत
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : तळकोकणातील तिलारी खोऱ्यात धुमाकुळ घालणाऱ्या हत्तींनी लॉकडाऊन असल्याने थेट रस्त्यांवर आणी शेतकऱ्यांच्या घराकडे मोर्चा वळवला देशात लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे बहुतेक सगळेच रस्ते निर्मनुष्य झालेत. वाहनांची वर्दळ थांबली. नेहमीचा गजबजाट बंद. एरवी रस्त्यावर, शेती बागायतीत फिरणारी माणसे घरात थांबली आहेत. त्यामुळे पशुपक्षी, वन्यप्राणी स्वच्छंदपणे बागडत आहेत. त्याला वन्यहत्ती तरी कसे अपवाद ठरतील.
कोरोनामुळे संचारबंदी, लॉकडाऊनमुळे माणसे घरात आणि वन्यप्राणी रस्त्यावर असे चित्र सध्या तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात पहायला मिळत आहे. या खोऱ्यातील बांबर्डे येथे दोडामार्ग बेळगाव या राज्यमार्गावर भरदिवसा तीन हत्तींचा कळप मुक्तपणे विहार करताना पहायला मिळत आहे. हत्ती रस्त्यावर आल्याचे दृश्य स्थानिकांनी घरात बसून शूट केल.
दोडामार्ग मधील तिलारी खोर म्हणजे वन्य हत्तींच जणू नदनवनच बनलेय. महाराष्ट्रातील हत्तींचे वैभव पाहायचे असेल तर दोडामार्गमध्येच यायला हरकत नाही. अकरा हत्तींचा पहिला कळप ऑक्टोबर २००२ ला आला तो दोडामार्गमधील मांगेली गावात. मनमुरादपणे बागडायला तिलारी धरणाचा पुरेसा पाणीसाठा, तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेर घनदाट जंगल, परिसरात भातशेती, फणस, अननस, केळीबागा यासारखे भरपूर खाद्य असल्यामुळे हत्ती इथे स्थिरावले.
सध्या तिलारीत पाच हत्ती आहेत. एका कळपात दोन पिल्ले आणि एक मादी तर दुसऱ्या कळपात एक मोठा टस्कर आणि मादी. गेले काही दिवस त्यांचा वावर बांबर्डे, घाटिवडे, वीजघर, घोडगेवाडी परिसरात आहेत. मात्र अचानक त्यातील एका कळपाचे दर्शन भररस्त्यात झाले. लॉकडाऊन आणि संचारबंदी पशू पक्षी आणि प्राण्यांच्या पथ्यावर पडली आहे. माणूस कोरोनाच्या भीतीने घरात थांबला असला तरी वन्यप्राण्यांसाठी लॉकडाऊन मुक्त विहारासाठीची संधी मिळाली आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या तिलारी खोर हत्तींसाठी संरक्षित जंगल करायची मागणी वन्यपेमींकडून केली जात आहे.