ठाणे : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. मुंबईनंतर आता ठाणे जिल्ह्यातील इतर भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे संपूर्ण शटडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण कळवा शटडाऊन करण्यात येणार असून केवळ मेडिकल सुरु राहणार आहेत. इतर अत्यावश्यक गोष्टींची फोन वरून डिलिव्हरी मागवण्याचं सांगण्यात आलं आहे. पालिकेने सर्व विभागातील नंबर जाहिर केले आहेत. 


कळवा हा ठाणे पालिकेतील हॉट स्पॉट आहे. आता पर्यंत इथे 10 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही येथील गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पालिकेकडून संपूर्ण शटडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.


सोमवारी देखील कळव्यात 2 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ठाणे पालिका क्षेत्रात आता पर्यंत 23 रुग्ण आढळले आहेत. 


दरम्यान, रविवारी मुंब्रा येथे राहणाऱ्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. मुंब्रा येथील अमृतनगर येथील 57 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून या रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याची माहिती आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कळवा-मुंब्रा-दिवा येथे वाहनांस प्रतिबंध घालण्यात आला आहे. रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत कळवा, मुंब्रा, दिवा भागात खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर सर्व गाड्यांना बंदी आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र आता कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता संपूर्ण कळवा शटडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.