आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : सर्वत्र खड्यांच्या समस्यांनी डोकं वर काढलं आहे. परिणामी खड्यांच्या रस्त्यांवरून वाहने चालवणे देखील फार जिकरीचे झाले आहे. त्याचप्रमाणे शाळकरी मुलांच्या अपघातांच्या संख्येमध्येही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प हा परिसर अत्यंत वर्दळीचा आणि घनदाट लोकवस्तीचा आहे. या भागाची स्मॉल इंडस्ट्रियल इस्टेट अशी ओळख आहे. उद्योगाचा परिसर, त्याचप्रमाणे लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील स्थानीकांचा आणि कामगारांचा जीव धोक्यात असल्याचे म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिसरात सर्वत्र खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचे अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहेत. मोठ-मोठ्या खड्ड्यातून वाट चुकवताना नागरिकांची तारांबळ होत आहे. अशा परिस्थितीत नगरसेवकांना वारंवार तक्रार करण्यात आली. परंतू या प्रकरणी नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. 


नगरसेवकांकडून कोणताही हलचाल होत नसल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आज स्वतःहून खड्डे भरत स्थानिक नगरसेवकांना श्रद्धांजली वाहिली. या अनोख्या आंदोलनादरम्यान नागरिकांनी नगरसेवक विरोधी घोषणाबाजी केली. दरम्यान या भागातील रस्त्यांची तातडीने सुधारणा व्हावी यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे वक्तव्य स्थानीकांनी केली आहे.