टँकरमधून केमिकल पडल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी
कल्याणमधला धक्कादायक प्रकार
कल्याण : कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वालधुनीमधल्या आंबेडकर चौकात केमिकल टँकरचं झाकण अचानक उघडल्यानं केमिकल पडून बाजूनं दुचाकीवरून जाणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालं आहे. रविवारी रात्री कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारं साळसकर दाम्पत्य खरेदी करुन घरी जात असताना हा प्रकार घडला. गौरी साळसकर यांच्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर केमिकल पडलं असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पती गौरेश साळसकर यांच्या डोळ्यात केमिकल गेल्यानं त्यांना एका डोळ्यानं दिसत नाही आहे.
पुढील उपचारासाठी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा तनिष किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येतो आहे. पण अजून टँकर चालकाचा शोध न लागल्यानं स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.