``मशीदीवरील लाऊडस्पीकर काढून टाका, असं कोर्टानं कधीच म्हटलं नाही?``: पाहा कुणी केला आहे दावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंग्यांच्या आवाजासंदर्भातील न्यायालयाचा निर्णयाचा हवाला दिला होता. परंतू असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसल्याचा दावा एका जेष्ठ वकीलांनी केला आहे.
वर्धा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंग्यांच्या आवाजासंदर्भातील न्यायालयाचा निर्णयाचा हवाला दिला होता. परंतू असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसल्याचा दावा जेष्ठ वकील आसिम सरोदे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यांनी त्यासाठी न्यायालयाच्या निकालाचा हवाला दिला होता. परंतू जेष्ठ वकील आसिम सरोदे यांनी असा दावा केला की, 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ज्यापद्धतीने भोंग्यांचा विषय मांडत आहेत. तो अत्यंत चुकीचा आहे. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते.खरं तर भारतातील कोणत्याच न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा असा निर्णय कधीच दिलेला नाही. राज ठाकरे यांना माझं आव्हान आहे. की त्यांनी मला कोणत्याही न्यायालयाचा निर्णय दाखवावा, ज्यात असं म्हटलंय की, मशिदीवरील भोंगे काढा. न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलणं हा न्यायालयाचा अपमान आहे. तसेच तो गुन्हा देखील आहे'. असे देखील सरोदे यांनी म्हटलं आहे.
'ध्वनीप्रदूषण हे सामाजिक स्वास्थाचा भाग म्हणून काम करायला हवे. कोणत्याही मशिदीवर भोंगे लावण्याची गरज नाही. कोणत्याही मंदिरांवर लाऊडस्पिकर लाऊन काकडा करण्याची गरज नाही. ध्वनीप्रदूषणामुळे आपली ऐकू येण्याची क्षमता कमी होऊ शकते. सरकारने ध्वनीप्रदूषण करणाऱ्यां सर्वधर्मिय प्रार्थना स्थळावर कारवाई करायला हवी.'असेही सरोदे यांनी म्हटलं आहे.