मुलीला डोळा मारला, तरूणाला ३ वर्षाची शिक्षा
रस्तावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केल्याने, एका युवकाला ३ वर्ष जेलमध्ये काढावे लागणार आहेत.
बीड : रस्तावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केल्याने, एका युवकाला ३ वर्ष जेलमध्ये काढावे लागणार आहेत. मुलीला वाईट नजरेने पाहणे आणि डोळा मारणे असा प्रकार या मुलाने केल्याने, त्याला सत्र न्यायालयाने ३ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपीचं नाव पुरूषोत्तम वीर असं आहे. या मुलाचं वय २४ वर्ष आहे. युवक शिरूर तालुक्यातील ढाकणवाडीचा राहणारा आहे.
हे संपूर्ण प्रकरण एप्रिल २०१७ चं आहे, मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी शिरूर जाण्यासाठी रायमोहा चौकात उभी होती, त्यावेळी पुरूषोत्तम वीर लांबून तिला वाईट नजरेने पाहत होता.
यानंतरही त्याच्यातला नराधम शांत बसला नाही, त्याने या मुलीला डोळा मारला. यानंतर या मुलीने २० एप्रिल २०१७ रोजी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या अल्पवयीन मुलीने गुन्हा दाखल केला, पोलिसांनी छेडछाड आणि लहान मुलांच्या शोषणाचा गुन्हा दाखल केलाय. पोक्सोनुसार त्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. या प्रकरणात सुनावणी सुरू झाली, तेव्हा आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करून सात साक्षीदारांची चौकशी झाली.
या प्रकरणाची सुनावणी मागील दीडवर्षापासून सुरू होती, यानंतर कोर्टाने दोषींना शिक्षा सुनावली आहे. आरोपी पुरूषोत्तम ३ वर्षाची शिक्षा सुनावली. त्याला ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला, त्याने दंड भरला नाही, तर आणखी एक महिना शिक्षा वाढणार आहे.
कोर्टाने दिलेल्या या शिक्षेनंतर मुलींची रस्त्यातील छेडछाड नक्कीच कमी होणार आहे, तसेच टवाळखोरांना जरब बसणार आहे. कोर्टाने अशा चौकातील गुंडांना निकालातून हा इशाराच दिला आहे.