पुणे : कोरोना विरोधातील उपाय योजनांच्या बाबतीत मात्र पुण्याला मुंबईचा आदर्श घ्यावा लागणार आहे. महत्वाचं म्हणजे त्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी थेट मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह यांना पुण्यात पाचारण केले आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत कोरोना नियंत्रणाचे धडे दिले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इक्बाल सिंह चहल यांनी पुणे प्रशासनाला या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.  पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारांवर गेली आहे. 


मागील दोन दिवसांत रुग्ण वाढीमध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकलंय. १५ जुलै ला मुंबईत १३९० तर पुण्यात १४१६ रुग्णांचे निदान झाले. १६ जुलै ला ही संख्या १४९८ आणि १८१२ अशी होती. अशा परिस्थितीत पुण्याने मुंबईच अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. शहरासह जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करून कामात गतिमानता आणण्याची गरज इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलीय. 



 
पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक शनिवारी आढावा बैठक घेत आहेत. उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. असं असताना रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये सुधारणा करण्याची तंबी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलीय. 
 
सध्या पुण्यात लॉक डाऊन सुरू आहे. व्यापारी तसेच नागरिकांचा विरोध असताना लॉक डाऊन लागू करण्यात आलाय. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीकोनातून रिझल्ट दाखवण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर आहे। त्यासाठीच अजित पवार यांनी चहल यांच्या हाती इंजेक्शन दिले आहे. आता कोरोना प्रादुर्भाव किती दिवसात आटोक्यात येतो, याकडे लक्ष आहे.