कोविड-१९ । पुण्याची चिंता वाढवणारी बातमी, शहरात बधितांची आकडा लाखाच्या पुढे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुण्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुण्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे शहरातील कोरोना बधितांची आकडा लाखाच्या पुढे गेला आहे. गुरुवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ४५९ इतकी झाली आहे. महत्वाचे म्हणजे ऑगस्ट महिना पुण्यासाठी सर्वाधिक घातक ठरला आहे.
पुणे जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ८४ हजार ७६५ रुग्ण आढळलेत. तर एकट्या ऑगस्टमध्ये हीच संख्या ८५ हजार ४४९ इतकी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ८६ हजार १२२ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात दिवसाला सरासरी ९० मृत्यूंची नोंद झाली आहे. या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात काल १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. काल १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०५ हजार ४२८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पुणे, नागपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढ होत असल्याने राज्य सरकारने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नागपुरात मुंबईची टीम दाखल होणार आहे.
पुणे : बाधित रुग्ण - (१,८६,१२२), बरे झालेले रुग्ण- (१,२७,०४६), मृत्यू- (४२३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४,८३८
दरम्यान, राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२९ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३ टक्के एवढा आहे.