मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्याची घोषणा केली आहे..सोमवारपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे..मंदिरात येताना मास्क लावणं,सोशल डिस्टनसिंग पालन करणं,आरोग्य सेतू ऍप वापरणं आवश्यक  आहे..कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून भक्तांना देण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिर खुली केली जाणार आहेत. त्यामुळे भक्तामधून समाधान व्यक्त केलं जातंय. मात्र मंदिरं खुली झाल्यानंतर भक्तांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. प्रत्येक देवस्थान समिती, मंदिर प्रशासन ते नियम कसे असतील यावर आज निर्णय घेणार आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील हीच रेलचेल सुरू आहे. 


कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर पूर्णवेळ खुलं करता येणार नाही असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्पष्ट केलंय. काही वेळासाठी सकाळ आणि संध्याकाळ मंदिर खुलं असेल. चार दरवाजांपैकी दोन दरवाजे भक्तांसाठी खुले राहणार आहेत. रोज तीन ते साडेतीन हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. 



तब्बल ७ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दार दर्शनासाठी उद्या  उघडणार आहे .प्रशासनाने याची जय्यत तयारी केली आहे .आज पूर्ण मंदिर व परिसर सॅनिटाईझ करण्यात येणार आहे . दर्शनासाठी नियमावली आखण्यात आली आहे . मंदिराच्या आतमध्ये  रांगांची आखणी करण्यात येणार आहे.दर्शनाला मंदिरात जाण्यापूर्वी प्रत्येकाचे थर्मल टेस्टिंग केले जाणार आहे. नोंदणी करूनच मर्यादित चार हजार भक्तांना मंदिरात प्रवेश  दिला जाणार आहे. ऑनलाइन दर्शन व मर्यादित प्रवेश या वर मात्र पुजारी नाराज आहेत . 


उद्या पाडव्याच्या दिवशी साईबाबांच्या काकड आरतीपासून साईमंदिर भक्तांसाठी खुलं होत आहे. काकड आरतीनंतर सुरूवातीला शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर बाहेरून आलेल्या भक्तांना दर्शन दिलं जाईल. बाहेरून येणाऱ्या भाविकांना वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने आरती आणि दर्शन बुकींग करूनच दर्शन घेता येईल. सध्या दिवसभरात केवळ ६ हजार भाविकांनाच दर्शन मिळेल. साईभक्तांना गेटनंबर २ मधून प्रवेश दिला जाईल. 


शिर्डीमध्ये साई मंदिर उघडण्याची लगबग सुरू झालीय. त्यासाठीच साई संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. आणि त्या मंदिरातल्या सोशल डिस्टन्सिंगच्या योजना जाणून घेतल्या. 


विदर्भातील पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बुलढाण्यातील शेगावचं श्री गजानन महाराजांचं मंदिर उद्या भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे... मात्र मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आह.. गेल्या आठ महिन्यापासुन कोरोनाच्या पार्षभूमिवर गजानन महाराज मंदिर बंद होतं.. राज्य सरकारनं मंदिरं खुलं करण्याचा आदेश दिल्यानं भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 


मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात उद्यापासून दर तासाला शंभर भाविकांना दर्शन मिळणार आहे. क्यू आर कोडच्या मदतीनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी ७ वाजल्यापासून एक एक तासाचे स्लॉट निश्चित करण्यात आलेत. परिस्थिती आणखी निवळल्यावरच ज्येष्ठ नागरिकांनी मंदिरात दर्शनाला यावं. सिद्धिविनायकाचं दर्शन ऍपवरही उपलब्ध आहे. 


मुंबईतल्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे माहीम दर्ग्यामध्ये महिन्यांनंतर प्रवेश मिळणार आहे. माहीम दर्ग्यात सर्वच धर्मीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळणं आव्हानात्मक असणार आहे. 


अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सर्व धार्मिक स्थळं खुली होणार आहेत. भाविकांना बाहेरच्या बाहेर नाही तर पूर्वीसारखं आतमध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. अर्थात कमीत कमी गर्दी आणि मास्क अनिवार्य आहे. मात्र भाविकांमध्ये आता आनंदाचं वातावरण तयार झालंय.