ना रेमडेसिवीर ना महागडी औषधं; तरीही हजारो रुग्णांना कोरोनामुक्त करणारा देवदूत
राज्यातील डॉ. रवी आरोळे यांनी एक चमत्कार करून दाखवला आहे. त्यांनी ना रेमडेसिवीरचा वापर केला ना महागड्या औषधांचा! उलट कमीत कमी खर्चात रुग्णांना बरे करून दाखवले आहे.
अहमदनगर : राज्यात दररोज 60 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे असंख्य रुग्ण आणि डॉक्टर हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीतही राज्यातील डॉ. रवी आरोळे यांनी एक चमत्कार करून दाखवला आहे. त्यांनी ना रेमडेसिवीरचा वापर केला ना महागड्या औषधांचा! उलट कमीत कमी खर्चात रुग्णांना बरे करून दाखवले आहे. आतापर्यंत असंख्य रुग्णांना त्यांनी कोरोनामुक्त केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधील जुलिया रुग्णालयाचे डॉ. रवी आरोळेंविषयी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर डॉ. रवी चर्चेत आले होते. तोपर्यंत डॉक्टर कोणताही बढेजाव किंवा प्रसिद्धीविना निरंतर रुग्णसेवा करीत होते. त्यांनी या कठीण परिस्थितही गरीब कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर हसु फुलवले.
परिसरातील लोकांमध्ये डॉ. रवी कुतूहलाचा विषय बनले आहेत. कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा अपुरा पडतोय. आणि रेमजेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होताना दिसून येत आहे. एकीकडे राज्यातील बहुतांष डॉक्टर कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी महागडे इंजेक्शन आणि रेमडेसिवीरचा उपयोग करीत असताना, डॉ. रवी यांनी आतापर्यंत कमीत कमी वेळा रेमडेसिवीरचा वापर केला आहे.
त्यांची उपचार पद्धती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. त्यात महागड्या औषधांचा सामावेश नाही. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने सांगितलेले औषधं स्वस्त आहेत. आतापर्यंत कमीत कमी खर्चाच्या औषधांचा वापर करून त्यांनी कोरोना रुग्णांना बरे केले आहे. डॉ. रवी ICMRच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात.
पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर, गरीब, कामगार वर्गाला घराबाहेर पडावेच लागते. त्यामुळे दबा धरून बसलेला कोरोना त्यांना ग्रासतो. आधीच आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या गरीबांनी महागडी औषधं आणि दवाखाने कुठून करायचे. याचा विचार करून पैशापेक्षा डॉ. रवी यांनी रुग्णसेवेला प्राधान्य दिले. तेही कमी खर्चामध्ये...!
डॉ. रवि यांनी आतापर्यंत 3700 रुग्णांना कोरोना मुक्त केले आहे. ICMRने निर्देशित केलेल्या औषधांचा वापर करून ते लोकांना कोरोनामुक्त करतात. अगदीच गंभीर रुग्णांना ते ऑक्सिजन देतात. त्यामुळे ज्या रुग्णांना खरंच गरज आहे त्यांना तातडीने ऑक्सिजन मिळते. आणि मृत्यूदर खूपच कमी राहतो.
कमी खर्चामध्ये कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या डॉ. रवि यांच्या उपचार पद्धतीकडे केंद्रीय तज्ज्ञांचेही लक्ष गेले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे य़ांना डॉ. रवि यांनी पत्र लिहले होते. त्यांनी कमी खर्चिक उपचार पद्धत कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी वापरली तर, लोकांचा खर्च वाचेल आणि प्राणही असे म्हटले होते.
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी डॉ. रवि यांची उपचार पद्धती संजिवनी देत आहे. डॉ. रविंनी पैसा नाही सेवेला मोठा धर्म मानला आहे.