दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु
Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाने टोकाचं पाऊल उचललंय. सुरक्षा रक्षक आणि एसआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Sachin Tendulkar News : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने आत्महत्या केली. प्रकाश कापडे (Prakash Kapde) असं मृत जवानाचं नाव असून त्यांनी आपल्या राहात्या घरी डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश कापडे हे जळगावच्या जामनेरमध्ये राहत होते. बुधवारी पहाटे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. प्रकाश कापडे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलं, बहिण आणि भाऊ असा परिवार आहे.
वैयक्तिक कारणाने आत्महत्या?
जामनेर पोलीस ठाण्याचे सीनिअर पोलीस अधिकारी किरण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश कापडे यांनी बुधवारी पहाटे 1.30 वाजता आत्महत्या केली. प्राथमिक तपासात प्रकाश कापडे यांनी वैयक्तिक कारणाने टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस अधिकारी किरण शिंदे यांनी सांगितलं. पण तपासानंतर आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल अशी माहितीही त्यांनी दिली.
व्हीव्हीआयपी सुरक्षेत तैनात
प्रकाश कापडे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कापडे यांच्या कुटुंबियांची, सहकर्मचाऱ्यांची आणि ओळखीच्यांकडून पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसआरपीएफकडूनही स्वतंत्र तपास केली जाण्याची शक्यता आहे. प्रकाश कापडे हे अनेक व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत तैनात होते.
प्रकाश कापडे हे गेल्या 15 वर्षांपासून SRPF मध्ये कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते नारायण राणे यांच्याही सुरक्षेतही काम केलं आहे. सध्या ते सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रकाश कापडे जळगावमध्ये आपल्या राहात्या घरी आले होते. बुधवारी पहाटे त्यांच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर घरच्यांनी धाव घेतली त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कुटुंबियांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.