सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : 50 हजार रुपयांसाठी 14 वर्षीय मुलीचा मध्य प्रदेश मध्ये सौदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune News) उघडकीस आला आहे. अवघ्या 50 हजार रुपयांसाठी या अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते. मात्र एका तक्रारीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी दोघांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन मध्य प्रदेश मध्ये विकणाऱ्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे .पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश मध्ये जाऊन सुटका केली आहे. शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह (40) आणि धर्मेंद्र यादव (22) अशी या आरोपींची नावे आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉपमध्ये काम करत होती. त्यावेळी या मुलीचा ओळख तिथे काम करणाऱ्या शांतीसोबत झाली. शांतीने या मुलीला तिच्या आवडीचा मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन दिले आणि तिला मध्य प्रदेश इथे नेले. यानंतर आधीच ठरल्याप्रमाणे शांतीने अल्पवयीन मुलीची अवघ्या 50 हजार रुपयांना विक्री केली. यानंतर तिचे धर्मेंद्र यादवसोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले. या सर्व प्रकारानंतर आरोपींनी मुलीला कुटुंबियांनी मारण्याची धमकी देखील दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. 


मात्र भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मुलीला शोधून काढले. मुलीचा परत आणण्यासाठी पुणे पोलिसांनी थेट मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.


नेमकं काय झालं?


"भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 14 वर्षाच्या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान ती मुलगी मध्य प्रदेश येथे असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांचे पथक मध्य प्रदेश येथे गेले. मध्य प्रदेशात पोहोचल्यानंतर त्या मुलीचे लग्न झाल्याची माहिती समोर आली. मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचे जबरदस्तीने धर्मेद्र यादव (22) याच्यासोबत लग्न लावून देण्यात आल्याचे समोर आले. ही मुलगी ज्या वर्कशॉपमध्ये काम करत होती तिथेच एक शांती उर्फ संतो हरनाम कुशवाह हिच्यासोबत ओळख झाली. तिने या मुलीला सांगितले की तुझा मित्र जो मध्य प्रदेशात गेला त्याने तुला लग्नासाठी तिथे बोलवले आहे. तिथे पोहोचण्याआधीच धर्मेंद यादवने शांतीला सांगितले होते की, मी तुला 50 हजार देतो मला लग्नासाठी मुलगी आणून दे. शांतीने 50 हजारांसाठी अल्पवयीन मुलीची विक्री केली आणि मुलीला धमकी दिली. यानंतर मुलीला महाराष्ट्रात आणण्यात आले असून ती सुखरुप आहे आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आली आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त समर्थांना पाटील यांनी दिली.


मुलीला आवडत असलेला मुलगाही मध्य प्रदेशातील होता. त्यामुळे मुलीला तू जर नाही गेलीस तर त्याचे दुसऱ्यासोबत लग्न लावले जाईल असे सांगितले गेले होते. त्यामुळे मुलगी शांतीसोबत मध्य प्रदेशात गेली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली.