कल्याण : शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या  नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पालिका प्रशासनाच्या या कारवाईनं शिवसेनेच्या गोटात संतापाचे वातावरण पसरले आहे.सेनेच्या नगरसेवकांनी मुख्यालयातल्या आयुक्त कार्यालयात घुसुन आयुक्तांची खुर्ची फेकून दिली. आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवत असल्याचा आरोप करीत आयुक्तांनी परत जाण्याची मागणी सर्व सेनेच्या नगरसेवकांनी केली. 


या घटनाचक्रात सेना नगरसेवक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून माहिती घेतली. पालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.


माजी महापौर वैजयंती घोलप, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, माजी सभापती प्रकाश पेणकर , सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह १०-१२ नगरसेवक आणि १०-१३ नगरसेविका यांच्या विरोधात सरकारी कार्यालयात जबरदस्तीने घुसणे, घोषणाबाजी करणे, शांतता भंग करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.