मुंबई : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. त्यातच सात दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत. 

 

4 ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील वसंतनगर इथल्या 26 वर्षांच्या महेश दयाराम राठोड या शेतकऱ्यानं उंदिर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 8 ऑगस्टला कळंब तालुक्यातील दहेगाव इथल्या 36 वर्षीय विनोद उर्फ चंदू गजानन सिडाम या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर त्याच दिवशी म्हणजे 8 ऑगस्टलाच चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील धानोराचे राजू बंडू पारखी या ३४ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. 

 

सततची नापिकी आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर यामुळे हताश होऊन या युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतात पाणी शिरले होते. हातातोंडाशी आलेलं पीक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला.

 

करोनाच्या संकटात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असा नारा दिला गेला. पण, आपल्याच कुटुंबाला दिवसाला दोन घास जेवणही पुरवू शकत नसल्याचे शल्य सहन न झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. 

 

यवतमाळातील बोथबोडनमध्ये काय घडलं?


यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन हे शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध गाव. या गावात गेल्या 18 वर्षांत 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा धोका लक्षात घेऊन आजवर गावात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री, खासदार, आमदार, श्री श्री रविशंकर यांच्यासह शेतकरी आत्महत्येच्या विषयावर अभ्यास करणारे अनेक तज्ज्ञ येऊन गेले. श्री श्री रविशंकर यांनी तर या गावातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रकल्प सुरू केले. अजूनही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. परिणाम दिसून येत नसल्याने प्रकल्प बंद करण्यात आला. 

 

या गावात 26 जानेवारी 2003 रोजी विनोद राठोड नावाच्या एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. यानंतर गावात आत्महत्यांचे सुरू झालेले दुष्टचक्र थांबलेले नाही. गेल्या 26 जुलैला विलास राठोड या युवा शेतकऱ्याने विष प्राशन करीत आत्महत्या केली आणि बोथबोडन पुन्हा एकदा चर्चेत आले. सततच्या नापिकीने विलास कर्जबाजारी झाले होते. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने बँकेच्या दृष्टीने ते थकीत कर्जदार राहिले. नवे कर्ज मिळाले नाही. यंदा शेतात पेरणी करण्यासाठीही पैसे उरले नाही. पाच एकर शेत पडीक राहिले. पीक नाही तर वर्षभर घरातील चार तोंडांची भूक कशी भागवायची या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यांनी आत्महत्या केली. 

 

वर्धा तालुक्यातील झाडगाव परिसरात सुरू असलेल्या टॉवरलाइनच्या कामात शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी कामे रोखून धरली. जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदनही देण्यात आलं होतं. आपल्याला न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेतली. वर्धा जिल्ह्यातील झाडगाव इथं प्रकाश भित्रे यांच्या शेतात ही घटना घडली. घटनास्थळी असलेल्या गर्दीने धावत जावून भित्रे यांचा जीव वाचविला. 

 

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कारखेडमध्ये शेषराव (वय 60) आणि जनाबाई मंजुळकार (वय 51) या शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन करत आत्महत्या केली. पावसाने पुन्हा दगा दिल्याने डोळ्यादेखत पीक करपू लागले. पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढविलेले हे पीक करपताना पाहून हे दाम्पत्य हादरलं.

 

याच सुमारास यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा इथल्या दिनकर पुंडलिक बोन्द्रे या शेतकऱ्याने किटकनाशक पिऊन  आत्महत्या केली. दुबार पेरणीचे संकट आले की दरवर्षी या शेतकरी आत्महत्या वाढतात.

 

शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भातील पाच जिल्ह्यांच्या तक्त्यावर नजर टाकली तर ही बाब अधिक प्रकर्षाने दिसून येते. 

 

विदर्भाच्या पाच जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्या 


 

- 2019 - 1 हजार 174 

 

- 2020 - 1 हजार 368

 

- 2021 - 388

 

करोनाच्या संकटातील दीड वर्षे


 

विदर्भातील सहा जिल्ह्यांचा विचार करता अमरावतीमध्ये 2019 मध्ये 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुलनेने 2020 मध्ये 295 शेतकरी आत्महत्या झाल्या. याशिवाय यंदा मे महिन्यापर्यंत 73 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. दीड वर्षांत 368 घटनांची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात दीड वर्षांतील आकडा 207, यवतमाळ 422, बुलडाणा 367, वाशीम 113 तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात 199 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा एकूण आकडा 1676 इतका आहे.

 

मागील 21 वर्षांत विदर्भातील सहा जिल्ह्यांत 18 हजार 711 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. 

 

- अमरावती : 4 हजार 200

 

- अकोला : 2 हजार 561

 

- यवतमाळ : 4 हजार 920

 

- बुलडाणा : 3 हजार 338

 

- वाशीम : 1 हजार 709 

 

- वर्धा : 1 हजार 983

 

8 हजार 519 पात्र प्रकरणे


 

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम व वर्धा जिल्ह्यात 18 हजार 711 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यातील केवळ 8 हजार 519 प्रकरणं पात्र ठरली आहेत. उर्वरित 9 हजार 847 प्रकरणे अपात्र ठरली असून 345 चौकशीकरिता प्रलंबित आहेत.

 

अपात्र शेतकरी आत्महत्या 


 

- अमरावती : 2169

- अकोला : 1064

- यवतमाळ : 2912

- बुलडाणा : 1752

- वाशीम : 999

- वर्धा : 951

- एकूण : 9847

 

कोरोना काळातील 43 टक्के शेतकरी आत्महत्या अपात्र 


कोरोनाच्या संकटात नोकरदार, दुकानदार, व्यापारी, कंत्राटदार अशा साऱ्यांचा विचार करण्यात आला. कोरोना वॉरियर्स घोषित करून 50 लाखांचा विमा जाहीर करण्यात आला. दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तो देण्यातही आला. जगाचे पोट भरण्यासाठी शेतकरी मात्र कायम झटत राहिला. जीवावर उदार होऊन शेती केली. लोकांचं रोजचं जगणं थांबू नये म्हणून बाजारात भाजीपाला आणत राहिला. दूध पोहचवू लागला. तरीही तो कोरोना वॉरियर ठरला नाही. 

 

सरकार लेखी दुर्लक्षित राहिला. या काळात जगणे मुश्किल होऊ लागल्याने काहींनी आत्महत्या केली. एकट्या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांत 2020 ते मे 2021 या दीड वर्षांच्या काळात 1676 शेतकरी आत्महत्या झाल्याची सरकारी नोंद आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या आत्महत्या झाल्या असतानाही सरकारने पात्र-अपात्रतेची खेळी खेळली. यातील केवळ 615 शेतकरी आत्महत्या असल्याचं मान्य केले. तर 716 शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. याची एकूण टक्केवारी 42.72 इतकी आहे. 345 चौकशीसाठी प्रलंबित आहेत.