सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक :  कमी वेळेत किंवा कोणतेही कष्ट न करता श्रीमंत होण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. याचाच फायदा काही भामटे घेतात. अधिक पैश्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडवण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशीच एक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करून जास्त पैसे मिळविण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी एका जेष्ठ नागरिकाला लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे क्रिप्टो करन्सी.... 
Bitcoin, Ethereum, Dogcoin या आणि अशा अनेक क्रिप्टो करन्सी आहेत. हि क्रिप्टोकरन्सी एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे. या करन्सीला प्रत्यक्षात हाताळता येत नाही. ज्याप्रमाणे बँकेतील रक्कम आपण प्रत्यक्षात न हाताळता ऑनलाईन UPI च्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करतो. अगदी त्याच प्रमाणे क्रिप्टोकरन्सी हि पूर्णपणे आभासी असते, आपण तिला हाताळू शकत नाही.  ज्या प्रमाणे शेयर मार्केट मध्ये चढ उतार बघायला मिळतो तसच काहीस क्रिप्टो करन्सीमध्ये सुद्धा बघायला मिळते. मात्र काही वर्षापासून क्रिप्टोकरन्सीची किमत कमी न होता वाढताना दिसत आहे.  


अशी करण्यात आली फसवणूक 
विष्णूकुमार सुरेंद्रकुमार बेटकरी (वय ५२, रा. वनश्री कॉलनी, अंबड, नाशिक) हे एका खाजगी ठिकाणी नोकरी करतात. बेटकरी हे सोशल मिडीयावर सक्रिय असतात. त्यांचं इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर अकाऊंट आहे. याच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी बेटकरी यांच्याशी जानेवारी महिन्यात संपर्क साधला. यानंतर बेटकरी यांना क्रिप्टो करन्सी बाबत माहिती देण्यात आली. यात त्यांना रक्कम गुंतवल्यास अधिकचा परतावा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर बेटकरी यांनी 17 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 या दरम्यान 3 लाख 25 हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यात जमा केली. 


असा झाला पर्दाफाश
पैसे दिल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे विष्णूकुमार बेटकरी यांनी संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होवू शकला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं बिटकरी यांच्या लक्षात आलं. बिटकरी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. यानुसार सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅनक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या बँक खात्यात बेटकरी यांनी रक्कम वर्ग केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत.