मुंबई :  एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी दोन हात करत असताना आता आणखी एक नैसर्गिक संकट मुंबईसह राज्यावर घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या २४ तासांत आणखी वाढणार असून त्यातून चक्रीवादळ निर्माण होणार आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून रायगडमधील  हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यत पट्ट्यात त्याचा परिणाम जाणवणार आहे. या तीन दिवसांत मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊसही पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली.


मुंबईला चक्रीवादळाचा धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ असा दुहेरी धोका आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाणार आहे. पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असतील आणि ३ जूनला संध्याकाळी किंवा रात्री चक्रीवादळ घोंगावू शकते. मुंबईत ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.


कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबाबत सांगितले की, कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या १२ तासांत अजून तीव्र होईल आणि त्यानंतरच्या १२ तासांत वादळ निर्माण होईल. या वादळाची गती आणि दिशा उत्तर दिशेला आहे. या काळात पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. ३ जून रोजी उत्तर कोकणात ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे.




आपत्तीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ सज्ज


मुसळधार, अतिमुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन मुंबईसह उत्तर कोकण किनारपट्टीवर एनडीआरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या एकूण ९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३ तुकड्या मुंबईत, दोन पालघरमध्ये, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एक तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. राज्यात आधीच कोरोनाचे संकट असताना आता मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ अशा दुहेरी संकटाला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एनडीआरएफ सज्ज झाली आहे.