`मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी यूपी, बिहारच्या कामगारांना डांबून आणलं`
`मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी यूपी, बिहारच्या कामगारांना डांबून आणलं`, राष्ट्रवादीची टीका!
मुंबई : आज राज्यात दोन दसरा मेळावे मुंबईत पार पडत आहे. शिंदे गटाचा बीकेसीवर तर उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवर पार पडत आहेत. दोन्ही गटाने आपली पूर्ण ताकत लावली, कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होते यासाठी शिंदे गटाने एसटी, खासगी गाड्या बूक केल्या होत्या. अशातच विरोधी पक्ष राष्ट्रवादीने शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे.
यूपी, बिहार, बंगाल या परराज्याच्या कामगारांना बसमध्ये डांबून बीकेसीच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यास घेऊन जाणं याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
दोन्ही दसरा मेळाव्यांमध्ये दोन्ही गटातील नेत्यांनी जोरदार भाषणं केलीत. शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. गुलाबराव मी काँग्रेसमध्ये होतो आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसऱ्याची सभा टीव्हीवर कायम ऐकायचो. तुम्हीही ऐकत असाल. हिंदुह्रदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणाले? शरद पवार. मोठ्याने नाव घ्या घाबरू नका. बारामतीचा महमद्या कोणाला म्हणाले, शरद पवार. दाऊदचा हस्त आहे कोणाला म्हणाले, शरद पवार. ही इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, कोण म्हणाले, तर हिंदुह्रदयसम्राट म्हणाले, असं म्हणत शहाजी पाटील यांनी टीका केली आहे.