भाजपमध्ये अस्वस्थता: खा. पटोलेंनंतर आमदारानेही केले बंड?
आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक पत्र लिहील्याचे समजते.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहांच्या नेतृत्वाखाली राजकीय दृष्ट्या 'अच्छे दिनां'वर स्वार झालेल्या भाजपमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. भाजपच्या विजयी झंजावत आणि पक्षांतर्गत व्यवस्थापनाखाली पक्षातील ज्येष्ठ आणि युवा नेते, खासदार, आमदार आजवर मौनात होते. मात्र, खासदार नाना पटोले यांच्या रूपाने ही खदखद बाहेर पडली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, आता विदर्भातील काटोल मतदार संघातील भाजप आमदार आशिष देशमुखही पटोलेंच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
देशमुख यांनी सडेतोड शब्दात भूमिका मांडली
आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक पत्र लिहील्याचे समजते. या पत्रत, देशमुख यांनी सरकार आणि धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी सडेतोड शब्दात आपली भूमिका मांडली आहे. राज्य सरकार विदर्भ आणि विदर्भातील शेतकरी, युवक यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याचा सरकारला विसर पडला आहे. नागपुरातील मेट्रो रेल्वेचा प्रकल्प थांबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती कार्यक्रम घ्यावा, असे सरकारला का वाटत नाही, असाही प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे. देशमुख यांच्या पत्रातील एकूण नूर पाहता आमदार देशमुखही पक्षाविरोधी बंडाच्या तयारीत असल्याची चित्र आहे.
विरोधकांना मिळाले आयते कोलीत
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. तर, राज्य सरकारचेही हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रात खा. पटोलेंच्या रूपाने तर, राज्यात देशमुख यांच्या रूपाने विरोधकांच्या हाती चांगलेच कोलीत मिळाले आहे. विरोधकांनी याचा खूबिने वापर केला तर, भाजप सरकारला बॅकफूटला जावे लागू शकते.