`ए बाबा, इतरांनी काय..`; फडणवीसांच्या स्फोटक पत्राबद्दल विचारल्यावर संतापले अजित पवार
Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राबद्दल विधानसभेबाहेर पत्रकारांनी प्रश्नांचा मारा केला असता अजित पवार संपाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नवाब मलिक यांना स्थान देण्यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवल्यानंतर आता या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नवाब मलिक हे राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदा विधानसभेत आले होते. त्यांनी कुठे बसायचं हा त्यांचा प्रश्न आहे. ते भूमिका स्पष्ट करतील तेव्हा मी याबद्दल प्रतिक्रिया नोंदवेन असं अजित पवार म्हणाले. मात्र पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अजित पवार चांगलेच संतापल्याचं दिसलं.
अजित पवार काय म्हणाले?
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात जाण्याआधी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस नवाब मलिकांसंदर्भात फडणवीस यांनी आक्षेप घेणारं पत्र तुम्हाला लिहिलं आहे, असं म्हणत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर, "मला ते पत्र मिळालं. मी ते पत्र वाचलं. नवाब मलिकसाहेब कालच पहिल्यांदा सभागृहात आले होते. ते कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनी दाखवलं आहे. 2 जुलैला आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यापद्धतीने आम्ही सरकारमध्ये गेलो. पहिल्यांदाच ते त्यानंतर सभागृहामध्ये आले. यामध्ये नवाब मलिकांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याबद्दल माझं मत देईन," असं उत्तर दिलं.
..मग मी माझी भूमिका मांडेन
"नवाब मलिकांसंदर्भात फडणवीस यांचं पत्र मला मिळालं. त्या पत्रासंदर्भात एवढं सांगायचं आहे की राजकीय घटनानंतर ते (नवाब मलिक) पहिल्यांदाच आले आहेत. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं नाही. त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका मांडेन," असं अजित पवारांनी दुसऱ्यांदा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सांगितलं.
"ऐ बाबा, एक मिनिट..."
नवाब मलिकांबद्दल बोलताना अजित पवारांनी, "आज तब्बेतीमुळे त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं मत काय आहे ते कळू द्या ना, असंही म्हटलं. "कोणी कुठे बसावं हा माझा अधिकार नाही. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे," असं अजित पवार म्हणाले. दिलीप वळसे-पाटील म्हणत आहेत की नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असं पत्रकाराने ओरडून सांगितलं. त्यावर अजित पवारांनी, "ए बाबा, एक मिनिट. इतरांनी काय बोललंय मला माहिती नाही. नवाब मलिकसाहेबांनी त्यांचं मत मांडल्यानंतर मी माझं मत देईल असं आता सांगितलं ना. तुम्ही इतर लोकांचं सांगणार यांनी असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं तर तुम्ही त्यांना विचारा," असं अजित पवार चढ्या स्वरात म्हणाले.
नक्की वाचा >> पत्रास कारण नवाब मलिक... फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं...
पत्राला रिप्लाय करणार का?
फडणवीसांच्या पत्राला रिप्लाय करणार का? असा प्रश्न ऐकून अजित पवार अधिक संतापले. त्यांनी, "मला त्या पत्राबद्दल काय करायचं आहे माझं मी करेन. ते मीडियाला सांगण्याची गरज नाही," असं उत्तर दिलं आणि निघून गेले.