जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : खून केल्यावर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न नागपुरातल्या एका दक्ष रिक्षाचालकाने उधळून लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. संशयित आरोपी हे मृताची मुलगी आणि जावई असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला. ऑटोरिक्षातून एक तरूण तरूणी एका मोठ्या सूटकेससह संशयास्पदरित्या निघालेत. मात्र, पोलीस पोहोचायच्या आत तरूण तरूणी रिक्षा सोडून पळून गेले होते. पोलिसांनी सूटकेस उघडली असता त्यातून निघाला एका वृद्धाचा मृतदेह आढळला.


५२ वर्षीय मानसिंग शिव यांचा हा मृतदेह होता. मानसिंगच्या मुलीने तीन वर्षांपूर्वी विजय तिवारीसह प्रेमविवाह केला होता. मात्र, प्रेमविवाहाला मानसिंगचा विरोध होता. जावई आणि सासरा यांच्यातील वादातून अखेर मानसिंगचा खून केल्याचा आरोप मृतक मानसिंग यांचा भाऊ रमेश शिव यांनी केला आहे.


जबर मारहाण करून मानसिंगचा खून करण्यात आला. त्यानंतर मुलगी आणि जावयाने नागपुरातील एका दुकानातून सूटकेस खरेदी केली. ते सूटकेस खरेदी करत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. त्यानंतर सूटकेसमध्ये मृतदेह भरून ते निघाले. पण सूटकेसमधून दुर्गंधी येत असल्याने रिक्षाचालकाला संशय आला. लघूशंकेच्या बहाण्याने तो रिक्षातून खाली उतरला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली.


मुलीनेच बापाची हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रिक्षात सूटकेस टाकून पळून गेलेल्या विजय आणि किरण या दोघांचा शोध सुरू आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.