प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक कमतरतेवर सहज मात करता येते, हे पायल पाटीलने दाखवून दिले आहे. अलिबाग जवळच्या ग्रामीण भागातील घोटवडे येथील पायलला ऐकू येत नाही. तरी देखील बारावीच्या कला शाखेतील परीक्षेत ८०.३० टक्के गुण प्राप्त केले आहेत. पीएनपी शैक्षणिक संस्थेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पायलने पटकावला आहे. दहावीच्या परिक्षेत सुद्धा ९० टक्के गुण मिळवून, पायलने प्रथम येण्याचा मान मिळवला होता. त्‍यावेळी झी २४ तासने 'संघर्षाला हवी साथ'मधून पायलच्‍या यशावर प्रकाश टाकला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानपणीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. आई शेतात काम करून घर चालवते. त्‍यामुळे घरची आर्थिक परिस्थिती देखील फार बिकट आहे. काकांच्‍या मदतीने तिने आपले शिक्षण सुरूच ठेवले. बेलोशी येथील लोकनेते दत्‍ता पाटील माध्‍यमिक शाळेत पायल सहावीत शिकत होती. त्‍यावेळी तिला गालगुंडाचा आजार झाला, आणि त्‍यात तिला पूर्ण बहिरेपणा आला. 


परिस्थितीवर मात करत जिद्दीने तिने शिक्षण पूर्ण केले. दत्‍ता पाटील शाळेत शिकताना तिने दहावीच्‍या परीक्षेत ९०.६० टक्‍के गुण मिळवले होते. पायलने दहावीत यश मिळवल्‍यानंतर तिची कहाणी झी २४ तासने संघर्षाला हवी साथ मधून समाजासमोर आणली होती. त्‍यानंतर पायलला मदतीचा ओघ सुरू झाला .


पायलची आकलन शक्‍ती कमालीची आहे. एक शब्‍दही ऐकायला येत नसतानाही ती शिक्षकांच्‍या ओठांच्‍या हालचालींवरून शिकली. अभ्‍यासाबरोबरच वक्‍तृत्‍व स्‍पर्धेतही ती अव्‍वल असायची. कर्णबधीर झाल्‍यानंतरही तिनं अभ्‍यासाचा ध्‍यास सोडला नाही, आणि जिद्दीच्‍या जोरावर तिने यशाचे शिखर गाठले आहे.


पायलची कलेक्‍टर होण्याची इच्छा
पायलला घरची परिस्थिती बदलायची आहे. त्‍यासाठी शिक्षण घेवून कलेक्‍टर व्‍हायचे स्‍वप्‍न तिने उराशी बाळगले आहे. 'मी अभ्‍यास नियोजन पूर्वक केला. त्‍यासाठी शिक्षकांचे खूप मार्गदर्शन लाभले.' असं पायलने म्हटलं आहे.


झी २४ तासची साथ 
पायलच्‍या कानावर कोचलर इन्‍प्‍लांन्‍ट सर्जरी ही शस्‍त्रक्रिया करायची होती. त्‍यासाठी शासनाकडून ३ लाखांची मदत मिळाली, परंतु ती पुरेशी नव्‍हती. पायल १० वी उत्‍तीर्ण झाल्‍यानंतर झी २४ तासच्‍या माध्यमातून पायलची कहाणी प्रकाश झोतात आली. त्‍यानंतर मुंबईतील केईएम रूग्णालयात तिच्‍यावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली.