पुणे/नाशिक : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभर थंडीचा कडाका वाढलाय. राज्यात सध्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. पुण्यात आजचं किमान तापमान ५.९ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आलं. जे गेल्या दहा वर्षातील सर्वांत नीचांकी तापमान आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात तर, थंडीचा कडाका वाढलायं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऱ्यानं निचांक गाठला आहे. तर थंडीची ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे. कोकणातही गेला आठवडा थंडी कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कायम असल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्याला हुडहुडी भरली़ आहे. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर ४८ तासांनंतर किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.


नाशिक जिल्ह्यात तर, थंडीचा कडाका वाढलायं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऱ्यानं निचांक गाठला आहे. यंदा पर्जन्याचं प्रमाण अल्प असलं तरी थंडीचा कडाका जाणवतोयं हे विशेष. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशापर्यंत घसरला होता.तर, यंदा डिसेंबरमध्ये पारा ५ अंशापर्यंत घसरला असून गेल्या वर्षाची नोंद मागे पडलीय. ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरीचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे नाशिक गारठले असून निफाड तालुका गोठला आहे.  सगळीकडेच उबदार कपडे घातलेले नाशिककर पाहायाल मिळतात. 


गेल्या आठवडाभरापासून जळगाव शहराच्या किमान तापमानात सातत्यानं घट होतेय. तीन दिवसांपूर्वी ८ अंशांवर असलेला तापमानाचा पारा ६ अंशावर आलाय. या मोसमातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद रण्यात  आलीय. गेल्या तीन दिवसात जळगावातील तापमानात २ अंशाची घट झाली असून कडाक्याच्या थंडीनं जळगावकर चांगलेच गारठलेत. 


पहाटे तसंच सायंकाळनंतर थंडीचं प्रमाण वाढतय. त्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतोय. येत्या आठवडाभर हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. शाळकरी विद्यार्थी, चाकरमान्यांना थंडीचा त्रास सहन करावा लागत असून वाढती थंडी आरोग्यासाठी चांगली असल्यानं मॉर्निंग वॉकला येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.