Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केलं आहे. वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची आणि महायुती सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 


दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे असं विचारण्यात आलं असता दीपक केसरकर म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे. त्याच पद्धतीने ते घेतलं पाहिजे. कदाचित वाईटातून काही चांगल घडायचं असेल म्हणूनही हा अपघात झाला असेल. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्यानुसार पुढील कारवाईही केली जाईल".


शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'



"नौदलाने उभारलेला पुतळा अपघातग्रस्त झाला याचं दुःख आहे. अरबी समुद्रातील पुतळा उभारणीचं काम काही तांत्रिक गोष्टींमुळे थांबलं,  त्यामुळे इथे हा पुतळा उभारला गेला. नौदलाला विश्वासात घेऊन पुन्हा या ठिकाणी स्मारक उभारलं गेलं तर ते चांगलं असेल. याबाबत मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. या ठिकाणी आता 100 फुटी पुतळा असावा," असंही केसरकर म्हणाले आहेत. 


 


आता 100 फुटी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जशा व्यवस्था आहेत तशी येथेही झाल्यास चांगलं होईल. बोलणारे काम करत नाहीत आणि काम करणारे बोलत नाहीत. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल. तो राष्ट्राचा सन्मान असेल असंही ते म्हणाले आहेत. 


पुढे ते म्हणाले, "स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू. हा अपघात आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल. संपूर्ण परिसराचा विकास करणे आणि पुतळा उभा करणे ही खरी आदरांजली असेल".


एकनाथ शिंदे काय म्हणाले?


"झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो. हा पुतळा नौदलाकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नौदलाने तयार केलं होतं," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 


पुढे ते म्हणाले की, "मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू".