शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 26, 2024, 08:54 PM IST
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...' title=

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली असताना सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी समुद्रात महाराजांचा पुतळा उभारणं अशक्य असल्याचं म्हटलं होतं. 

नेमकं काय झालं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. 8 महिन्यातच पुतळा कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, कामावर प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'

 

राज ठाकरे काय म्हणाले होते?

"समुद्रात छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा उभा करायचा आहे. या एका पुतळ्याच्या नावाखाली सर्वांनी मतं मागितली. नंतर समुद्रात जाऊन फुलं टाकली. 2007-2008 ला हा विषय आला होता, तेव्हापासून मी हा पुतळा होऊ शकत नाही असं सांगत आहे. समुद्रात इतका मोठा पुतळा उभा करणं अशक्य गोष्ट आहे. महाराजांचं स्मारक हे आपले गडकिल्ले आहेत. ते आपण सुधारले आहेत. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आमचा राजा कोण होऊ गेला हे दाखवलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले होते.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो. हा पुतळा नौदलाकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नौदलाने तयार केलं होतं," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

पुढे ते म्हणाले की, "मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू". 

आदित्य ठाकरेंचा संताप

आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे अशा शब्दांत आपल्या संताप व्यक्त केला आहे. "आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही! निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्धाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ ८ महिन्यातच कोसळलं.  मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे.  त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही.  आज जेव्हा आमच्या महाराजांचा पुतळा पडलेला पाहिला तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्या. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या मिंधे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं! महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रतिमेला सांभाळायला हवं!", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.