खूप प्रयत्न केले पण `या` एका कारणामुळे झाला लोकसभा निवडणुकीत पराभव; अजित पवार यांची कबुली
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढलीय. या यात्रेदरम्यान निफाड इथल्या सभेत अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी का मागितलीय.
Ajit Pwar : अजित पवारांचं हे महत्त्वाचं विधान.. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर अजित पवारांनी सपशेल माफी मागितलीय. कारण लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा फटका महायुतीला बसला. निवडणुकीच्या काळात महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारनं कांदा,सोयाबीनसह जवळपास सर्वच शेतमालाचे दर वाढू नयेत यासाठी धोरण आखलं होतं. मध्यमवर्गीयांना खूश करण्याचं धोरण सत्ताधाऱ्यांना चांगलंच महागात पडलंय. कांदा पिकवणाऱ्या भागात शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात मतदान करत करेक्ट कार्यक्रम केला.
कांदा पट्ट्यात भारती पवार, हेमंत गोडसे, हिना गावीत सुजय विखे-पाटील,सुभाष भामरे, शिवाजीराव आढळराव-पाटील,सदाशिव लोखंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सरकारनं कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांना मतदानातून रोष व्यक्त केलाय, याची जाहीर कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय, आता माफी मागून काय उपयोग असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावलाय.
भारतात कांद्याचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होतं. विशेषत: नाशिकसह पुणे,नगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. लोकसभा निवडणुकीआधी केंद्राय कांदा निर्यातबंदी केली होती. मात्र या निर्यातबंदीमुळे शेतमालाचे दर पडले आणि त्याचा मोठा फटका कांदा पट्ट्यासह संपूर्ण राज्यातच महायुतीला बसला. गेल्यावेळी लागलेली ठेच पाहता आता विधानसभा निवडणुकीआधी कांद्याच्या मुद्द्यावर अजित पवारांनी शेतक-यांची माफी मागितलीय. मात्र, शेतमालाच्या मुद्यावर शेतकरी माफ करणार का? हा मोठा प्रश्न आहे.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरून अमोल कोल्हेंनी निशाणा साधलाय...नागपंचमी आपण का साजरी करतो? याची सर्वांना कल्पना आहे...पण सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघालीय...जनता स्वाभिमानी आहे. ती हे सगळं जाणून आहे...असा टोला कोल्हेंनी अजित पवारांना लगावलाय...