Deglur Assembly Bypolls Result : काँग्रेसने फटाके फोडले, भाजपाचा पराभव
भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने गड राखण्यात यश मिळवलं
नांदेड : नांदेडमधल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत (Deglur Assembly election bypolls) काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला. आपला विजय हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचं जितेश अंतापूरकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेने मला भरभरुन प्रेम दिलं, त्यामुळे आपला विजय झाल्याचं जितेश अंतापूरकर यांनी म्हटलं आहे.
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. 14 टेबलर 30 फेऱ्यांची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच जितेश अंतापूरकर आघाडीवर होते. शेवटच्या फेरीअखेर अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 840 मतं मिळाली. तर भाजपाच्या सुभाष साबणे यांना 66 हजार 907 मतं मिळाली. वंचितचे उमेदवार उत्तम इंगोले यांना 11 हजार 347 मतांवर समाधान मानावं लागलं.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते, पण मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत होती. काँग्रेसतर्फे जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भाजपतर्फे सुभाष साबणे (Subhash Sabane) आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.
या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपतर्फेही अनेक नेते आमदारांनी जोरदार प्रचार केला होता.