नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्या घरी ईडीने धाड टाकली होती. ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईत खडसे यांचे घर आणि मालमत्ता जप्त करण्याची नोटीस दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीच्या या निर्णयाविरोधात एकनाथ खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन दिल्ली हायकोर्टाने ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेवर आणि दिलेल्या ऑर्डरवर स्थगितीचा निर्णय दिला आहे. 


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. तसेच खडसे यांचे घर खाली करण्याची नोटीस दिली होती. या नोटीसलाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.


खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ईडीला तातडीने पत्र लिहून दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या ऑर्डरची माहिती कळविली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता एकनाथ खडसे यांनी घर खाली करण्यापासून दिलासा मिळाला आहे.