चित्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा : दिल्लीचा रहिवासी असलेला एक तरुण लोणावळा-खंडाळ्याच्या जंगलात बेपत्ता झाला होता. 20 मेपासून बेपत्ता झालेल्या या तरुणाचा गेले चार दिवस NDRF आणि INSशोध घेत होते. फरहान शाह असं या तरुणाचं नाव आहे. दुर्देवाने आज या तरुणाचा मृतदेह आढळून आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटनासाठी लोणावळ्यात
मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेला फरहान शाह कामानिमित्ताने काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये आला होता. त्यानंतर फिरण्यासाठी म्हणून तो लोणावळ्याला आला होता. पण लोणावळा-खंडाळ्याच्या जंगलात फिरताना तो वाट चुकला. 20 मेला दुपारी फरहानने कुटुंबियांशी शेवटचा संपर्क साधला. पुढच्या तीन-चार तासात संपर्क झाला नाही तर माझा शोध सुरु करा असं फरहानने कुटुंबियांना सांगितलं होतं. पण त्यानंतर त्याचा काहीच संपर्क झाला नाही. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला


यानंतर गेले चार दिवस फरहानचा शोध सुरु होता. फरहानच्या कुटुंबियांनी त्याला शोधणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. 


चार दिवस सुरु होता शोध
फरहानच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं.  त्याबरोबरच शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव मावळ आणि पोलीस दल शोध घेत होते, तर आज सकाळपासून NDRF आणि INS कडून फरहान शहा याचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज सकाळी NDRF ला फरहान याचा मृतदेह डुक्सनोझ जंगलात आढळून आला.