बुलढाणा : आजही गावागावांत मुलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना आरोग्य केंद्राच्या हेळसांडीमुळे अनेक समस्यांना सामोरं जाव लागत आहे. अशीच हेळसांड बुलढाण्यातील गरोदर महिलेची झाली आहे. प्रसुतीच्या दोन तास कळा सहन केल्यानंतर महिलेला रूग्णालयाबाहेरच बाळाला जन्म देण्याची वेळ आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार घडला आहे. ड्युटीवर डॉक्टर, कर्मचारी नसल्याने महिलेची प्रसुती लगतच्या घरातच करण्यात आली. संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर रात्री महिला प्रसुती कळा सोसत दोन तास वाट पाहात होती. मात्र केंद्रात कोणीच नसल्यामुळे अखेर केंद्राजवळच्या घरात नेऊन महिलांच्या मदतीने प्रसुती करण्यात आली. माता आणि बाळ यांना खासगी वाहनाने शेगाव सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


बराच वेळ महिलेला तपासायला डॉक्टर येत नव्हते. महिलेच्या प्रसुती कळा वाढतच होत्या. त्यामुळे महिलेला रिक्षातच बसवण्यात आले. नंतर तिच्या कळा जास्त वाढल्याने केंद्रा शेजारी असलेल्या घरामध्ये महिलेची प्रसुती करण्यात आली. तेथील महिलांच्या मदतीने गरोदर महिलेची प्रसुती करण्यात आली. या घटनेवरून पु्न्हा एकदा राज्यातील मुलभूत सुविधा दुर्लक्षित असल्याचं दिसून येत आहे.