उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. `हू किल्ड करकरे` पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Who Killed Karkare Book : हू किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता आणखीच चिघळला आहे. 26/11 चा दहशतवादी हल्ल्याचा खटला चालवणारे तत्कालिन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी केली आहे. त्यांनीच हू किल्ड करकरे हे वादग्रस्त पुस्तक लिहिलंय. निकम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यावेळच्या शासनाची आणि कोर्टाची दिशाभूल केली, असा दावाही मुश्रीफांनी केला.
विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. आरएसएस आणि करकरे यांच्यात वाद सुरु होते. त्यामुळेच अशा थिअरी मांडल्या जातात. असं विधान राऊतांनी केले. व़डेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केलीय.. हे लोक आता पाकिस्तानची भाषा बोलू लागलेत अशी टीका शिंदेंनी केलीय.. तर राऊतांच्या विधानावर नितेश राणेंनी आपल्या खास शैलीत टीका केलीय, नितेश राणेंनी राऊतांची तुलना पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंशी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार
काँग्रसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपने मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार केली आहे... वडेट्टीवारांनी हेमंत करकरे प्रकरणी RSS आणि महायुतीचे मुंबईतले उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा भाजपनं केलाय... तसंच वडेट्टीवारांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं असून, हा न्यायालयाचा अवमान असल्याचंही भाजपनं म्हंटलंय. वडेट्टीवारांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगानं चौकशी करायची मागणी भाजपनं केलीये.
हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती
एस एम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकमांवर टीका केलीय. हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, एका पोलीस अधिका-यानंच करकरेंचा बळी घेतला. असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर टीका केलीय. तर वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.