Devendra Fadnavis: ठाकरेंना CM पदाचे आश्वासन दिलेच नाही, त्या रात्री शहांनी दिली होती `ही` ऑफर
भाजपतर्फे महाविजय 2024 अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत भिवंडीत आमदार, खासदारांचे प्रशिक्षण वर्ग भरवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतची युती का तुटली याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंना CM पदाचे आश्वासन दिले गेलेच नव्हते. त्या रात्री भाजप नेते अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याचा खुलासा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री भाजपचा होईल असा निर्णय झाला होता. तसेच अमित शाह यांनी शिवसेनेला जादा मंत्रीपदांची ऑफर दिली होती. ठाकरेंना अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता अस फडणवीस यांनी सांगितले. आम्ही जेव्हा जिंकत होतो, तेव्हा मी नागपुरातून उद्धव ठाकरेंना फोन केला होता की एकत्र पत्रकार परिषद घेऊ. यावेळी वहिनींसमोर पत्रकार परिषदेचा सराव केला. यानंतर मुख्यमंत्री पदाची चर्चा झाला. मला जेव्हा मध्यरात्री ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते. मी शाहांना तेव्हाच फोन केला होता, त्यांनी तसे काही ठरले नसल्याचे सांगितले. मी परत उद्धव ठाकरेंना फोन करून हे सांगितले होते. तेव्हा त्यांनी युती शक्य नसल्याचे कळविले आणि एका झटक्यात युती तोडली.
2019 साली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानी शिवाय याला दुसरं काही म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मते मागीतले. त्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेद्वारांना जिंकवून देण्यासाठी घाम गाळला. शिवसेनेन भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे. अमित शहा म्हणाले दहा अपमान सहन कर पण बेईमानी सहन नको करुस. बेईमानी सहन करणारे राजकारणात टिकत नाहीत.
मेहबूबा मुफ्तींबरोबर गेलो अशी टीका केली जात आहे. मात्र, देशासाठी मेहबूबा मुफ्तींबरोबर जावं लागलं. तेव्हाची ती आवश्यकता होती. पाकिस्तान संपूर्ण विश्वास सांगत होता की काश्मीरमध्ये लोकशाही नाही. तेव्हा काश्मीरमध्ये आपण निवडणूका घेऊन दाखवल्या. काश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊ शकते, हे देखील करुन दाखवलं.
पक्ष फोडल्याच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष फोडल्याचा आरोप केला जातोय. या आरोपांना देखील त्यांनी जाहीर प्रत्युत्तर दिलेय. लोक म्हणतात दोन पक्ष फोडले, घर फोडले. मला सांगा सुरुवात कोणी केली? अस प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. पक्ष फोडल्याचा आरोप केला जातोय मग मला सांगा शिंदे आणि पवार काय काल राजकारणात आलेले आहेत का? मी त्यांच्यावर मोहिनी घातलीय का? जेव्हा जेव्हा पक्षांत अन्याय होईल तेव्हा तेव्हा शिंदे जन्माला येतील असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. शिवसेनेशी इमोशनल युती आहे, राष्ट्रवादीशी राजकीय. कदाचित पुढील 10 ते 15 वर्षांत ती देखील इमोशनल युती होईल असे फडणवीस म्हणाले.