Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असो किंवा महायुतीमधील घटक पक्ष असो सर्वांच्याच गल्लीपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरु झाले आहेत. आढावा बैठकींबरोबरच जागावाटप, समन्वय आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद असे कार्यक्रम सुरु झाले आहेत. अशाच एका पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये बुधवारी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कठोर शब्दांमध्ये टीका करत त्यांना थेट आव्हानच दिले. 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज केलं आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या या आव्हानावर अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि एका वाक्यात उत्तर दिलं. 


एकेरी संदर्भ देत फडणवीसांना आव्हान देताना उद्धव नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत देवेंद्र फडणवीसांबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपाचा संदर्भ देत ठाकरेंनी फडणवीसांचा थेट एकेरी संदर्भ देत विधान केलं. "अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलोय. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या (शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या) हिंमतीवर आव्हान त्यांना देत आहे," असं उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.


फडणवीसांचं उत्तर


उद्धव ठाकरेंनी थेट एकेरी संदर्भ देत केलेल्या टीकेवरुन फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये चालता चालताच या आव्हानाला उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' या आव्हानावर फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देताना अवघ्या चार शब्दांची प्रतिक्रिया नोंदवली. "योग्य वेळी उत्तर देऊ," असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या या आव्हानावर मुंबईमध्ये पत्रकारांशी सविस्तर बोलणं टाळलं.


मोदींना नडल्याचंही विधान


उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. "आता लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही (अमोल किर्तीकरही) जिंकलाच आहे. अखिलेश (यादव), ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकड्यात गेलात की तोडू," असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, "भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली," अशी टीकाही केल्याचं पहायला मिळालं.