`दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा,` भाषण सुरु असतानाच कार्यकर्ता ओरडला, अजित पवार म्हणाले `तू चंद्रावर जा आणि...`
अजित पवार (Ajit Pawar) सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि समर्थकांची भावना आहे. पण अजित पवारांना अशांना आपल्या भावना आवरण्याचा सल्ला दिला होता. त्यात आज तर थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं.
अजित पवार (Ajit Pawar) सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि आमदारांची भावना आहे. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये नेत्यांकडून ही भावना बोलून दाखवली जात आहे. अजित पवारांना या उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना जरा धीर धरा असा सल्ला काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत दिला होता. पण त्यानंतरही कार्यकर्ते मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आज तर बारामतीत थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनीही भन्नाट उत्तर दिलं.
अजित पवार बारामतीत असून यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण सुरु असतानाच एक कार्यकर्ता 'दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा' असं ओरडला. त्यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भन्नाट 'तू चंद्रावर जा आणि मला मुख्यमंत्री व्हायला सांग' असं उत्तर दिलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
"मी खोटं बोलत नाही. मी थोडा कडक शिस्तीचा आहे. पण काम चोख करुन घेतो. आपण अनेकांना संधी दिली असून, त्यांनी संधीचं सोन केलं. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं की बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता आपला कणा आहे. तुमच्या आजुबाजूला बसलेला आम्हाला मदत करत नाही अशी तक्रार केली जाते. प्रत्येकाचं बोलणं, करणं प्रत्येकाला आवडेल असा माझा दावा नाही. माझ्यावरही काहीजण समाधानी नसतील. पण आपण प्रत्यकेजण समाधानी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे," असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलं.
"पाचव्यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी असताना राज्यासह आपल्याही तालुक्याला मदत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. मी जरी सतत बारामतीत येत नसलो तरी कारखाने कसे सुरु आहेत, येथील प्रश्न, अपेक्षा यांची जाणीव आहे," असं अजित पवारांनी सांगितलं.
"बारामती नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका घेता येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी अस्वस्थता आहे," असं ते म्हणाले. वरिष्ठांकडून निर्णय घेतला जात नसल्याने 2 जुलैला आम्ही निर्णय घेतला असंही त्यांनी सांगितलं.
"65 आमदार आम्ही एकत्र आहोत. त्याच्यातील जवळपास 50 ते 52 आमदार एका बाजूला 13-14 आमदार एका बाजूला आहेत. वरिष्ठांनी पक्ष स्थापन केला तेव्हा त्यात अनेक नेते होते. सगळ्यांना प्रयत्न केला. 25 वर्षात घड्याळ, झेंडा, पक्षाची भूमिका दूरपर्यंत नेली. शेतकरी, दुध उत्पादक, कांदा शेतकरी सर्वांसाठी काम केलं," असं अजित पवार म्हणाले.
"मुख्यमंत्रीपदासाठी मी हापापलेलो नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत काम झालं पाहिजे अशी भूमिका आहे. लोकशाहीत बहुसंख्येला महत्व असतं. काँगेसबरोबर सरकार आल तेव्हा मुख्यमंत्री आरआरपाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. विरोधी पक्ष नेता म्हणून फक्त भांडण करता येतात विकास करता येत नाही," अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.