पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. राज्यातील आणि पुण्यातील कोरोना (Corona) परिस्थितीसंदर्भातही काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यावेळी मांडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांशी संवाद साधताना कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही, त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता आणलेली असली तरीही नागरिकांनी गाफील न राहता नियमांचं पालन करावं असा आग्रही सूर त्यांनी आळवला. वैद्यकिय महाविद्यालयांबाबत राज्य शासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 


कोरोना प्रादुर्भावामुळं राज्यात शाळा आणि महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद असून, ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु आहे. अशा परिस्थितीत वैद्यकिय महाविद्यालयं सशर्त सुरु करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात असल्याचं अजित पवार म्हणाले. 


लागली से आस! आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार माऊलींची पालखी 


 


वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेशाची मुभा देत महाविद्यालयं सुरु करण्यासाठी राज्यात सकारात्मक पावलं उचलली जाऊ शकतात हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भातील चर्चा केली जाणार असल्याचं म्हणत येत्या काळात वैद्यकिय क्षेत्राची मदत आणि महाविद्यालयांतून उत्तीर्ण होऊन सेवेत येणाऱ्या डॉक्टरांचा लागणारा हातभार पाहता, हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं ते म्हणाले. 


येत्या काळात राज्यात वैद्यकिय महाविद्यालयं सुरु झाली, तरीही 10-15 दिवसांमध्ये तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, सर्वांच्याच सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं उपमुख्य़मंत्री म्हणाले. 


मॉल तूर्तास बंदच... 


पुण्यामध्ये 18 वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंनी लस घेतली असल्यास त्यांना इनडोअर खेळांसाठी परवानगी देण्यात येत असल्याचं अजित पवार यांनी सांगत मॉल मात्र तूर्तास बंदच ठेवले जाणार असल्याची बाब स्पष्ट केली.


पुणे जिल्ह्यात मॉल सुरु करायचे का हा प्रश्न उपस्थित केला जात असला तरीही मॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा असते आणि त्याच हवेचा प्रवाह तिथे सुरु असतो. शिवाय मॉलमध्ये अनेकदा नागरिक बराच वेळ व्यतीत करतात. त्यामुळे सध्या मॉल सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगत त्यांनी कोरोनाचं सावट अद्यापही कायम असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला.