मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; आदेशानंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरुच
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केाची टोपली दाखवली जात आहे.
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : गणेशोत्सवासाठी (ganeshoutsav 2023) चाकरमान्यांनी कोकणाची (Kokan) वाट धरली आहे. मुंबई गोवा महामार्गावरुन (mumbai goa highway) जीवघेणा प्रवास करत चाकरमानी कोकण गाठत आहेत. मात्र प्रवास सुखरुप व्हावा यासाठी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना (heavy vehicle) बंदी घातली आहे. मुंबई-गोवामहामार्गावर गौरी गणपती सणाच्या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीला 30 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली होती. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले होते. मात्र बंदी आदेश झुगारून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील अवजड वाहनांची वाहतूक महामार्गावरून सुरू आहे. प्रशासनाच्या बंदी आदेशाला वाहन चालकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता प्रशासनाचा आदेश झुगारल्याने या वाहनचालकांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
येत्या 19 सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी मुंबई-गोवावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले होते. या आदेशानुसार, मुंबई-गोवा महामार्गावर 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. हा आदेश दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सिजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारे वाहने वगळून अन्य वाहनांसाठी होता. तसेच अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका, एसटी महामंडळ बसेस, आराम बसेस व अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना ही बंदी लागू असणार नाही. मात्र तरीही सर्रासपणे इतर अवजड वाहने मुंबई गोवा हायवेवरुन जाताना दिसत आहेत.