भारतातील एकमेव शिवपिंडीतील भगवान ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिगुणात्मक अंगुलीसमान प्रतिकांची झीज
त्र्यंबकेश्वर( trimbakeshwar) मंदिर (temple) देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांनी पुरात्वत (archiolodical )विभागाकडे अहवाल केला सादर
योगेश खरे, नाशिक:
संपूर्ण देशात आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील खोलवर असलेल्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. नेहमीप्रमाणे शिवालयात दिसणारे मोठे शिवलिंग साळुंका इथे आढळून येत नाही. या योनीस्वरूप पिंडात तीन छोटी प्रतिकात्मक विश्वाची रचना करणारे भगवान ब्रम्हा, विष्णू आणि महेश विराजमान असल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. म्हणूनच संपूर्ण भारतातील शिवभक्त महाधिदेवांचे दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. मात्र मंदिरात असलेल्या शिवलिंगाची पुन्हा एकदा वजर्लेपाची झीज होत असल्याचा दावा मंदिरातील पुजाऱ्यांनी आणि देवस्थान ट्रस्टने केला आहे.
अशी होतेय झीज
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीत भगवान ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक प्रतिके आहेत . या अनोख्या शिवपिंडीचे दर्शन करण्यासाठी नुकतेच श्रावणामध्ये लाखो भावी त्र्यंबकेश्वरात उपस्थित झाले होते. तसेच सध्या पितृपक्षातही पूजा विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भावी इथे येत आहेत. या मंदिरातील गाभाऱ्यातील पूज्य असलेल्या या त्रिगुणात्मक अंगुली समान तीन उंचवट्यातील एक उंचवट्यावरील कंगोरा निखळू लागला असल्याचे पुजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मंदिरातील गाभाऱ्याचा व्यवस्थापन सांभाळणाऱ्या तुंगार बंधूंनी याबाबतची माहिती मंदिर विश्वस्तांना दिली . पेशवेकालीन असलेलं हे मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्यामुळे त्याविषयीची माहिती औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाला देण्यात आली आहे.देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांनी याचा पंचनामा केला असून याचा अहवाल त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे आणि पुरातत्व विभागाला सादर करण्यात आला आहे.
यापूर्वीही करण्यात आला होता वज्रलेप
मंदिरात असलेल्या शिवलिंगाची झीज होत असल्याच १९९० साली लक्षात आले होते. त्यानंतरही शिवपिंडीवर भाविकांकडून दुध, दही, साखर आणि इतर वस्तूचा वापर करून अभिषेक करण्यात येत होता. परिस्थिती लक्षात घेता सर्वानुमते भाविकाकडून होणारे अभिषेक थांबवण्यात आले. नंतर सन 2006 मध्ये एका रात्रीत अचानक वज्रलेप करण्यात आला होता त्याबाबत पूजकांनी शास्त्रोक्त पद्धतीने ही कामगिरी करण्यात आला नसल्याचं पूजकांनी आक्षेप नोंदवला होता त्रिगुणात्मक आकारही बदलला असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी मंदिराच्या गर्भगृहात जाणाऱ्या प्रत्येकाला दुधाने अभिषेक न करता फक्त पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतरही पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी वज्रलेप निखळत असल्याचं समोर आलं आहे
तज्ञांचे मत
बावीस वर्षांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता शिवपिंडीला वज्रलेप लावण्यात आला होता. मात्र पिंडीवरील वज्रलेप निघू लागला आहे. सद्यस्थिती लक्षात घेता वज्रलेप निकामी ठरत असल्याच लक्षात आले आहे. यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेच असल्याच मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
मंदिरातील गर्भगृहातील दिवसभरात भाविकांची प्रवेशसंख्या कमी करणे.
शिवपिंडीवर उंचावरून टाकले जाणारे पाणी थांबवणे गरजेचे आहे.
शिवपिंडीला मनुष्याचा होणारा स्पर्श टाळणे.
रासायनिक पदार्थ दूध तसेच तत्सम पदार्थ पुजाविधी करतांना टाळणे