जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचा गर्भित इशारा, `तुम्ही फक्त आवताडेंना निवडून द्या....पुढे मी....`
राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना पंढरपुरात विधानसभेची पोटनिवडणूक सुरु आहे. यात राज्यातील नेतेमंडळी वक्तव्य झाडतायत,
सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना पंढरपुरात विधानसभेची पोटनिवडणूक सुरु आहे. यात राज्यातील नेतेमंडळी वक्तव्य झाडतायत, अगदी बंदुकीच्या गोळ्यांसारखी. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप येण्याचे संकेत असलेलं वक्तव्य आज पंढरपूरजवळील मंगळवेढ्यात केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत मंगळवेढ्यात बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचं मंत्रिपद गेलं आहे आणि अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय चौकशी लागली असताना, देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
''सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो''
देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य आघाडी सरकारला सावध करणार आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांना तयार राहा असं सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना करताना म्हटले आहे, तुम्ही फक्त समाधान आवताडे यांना निवडून द्या, ''सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो''.
राज्याच्या राजकारणात लवकरच भूकंप?
देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य अशा वेळेस आलं आहे, ज्यावेळेस सरकार अडचणीत आहे, दुसरीकडे कोरोनाच्या बाबतीत सरकारसमोर आव्हान उभं असताना, तसेच त्यांच्या इतर मंत्र्यांवर आरोप होतील असे संकेत असताना हे वक्तव्य आल्याने, राज्याच्या राजकारणात लवकरच भूकंप होणार तर नाही ना, यावर चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या निधनानंतर पोटनिवडणूक
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झालं, यानंतर येथे विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीने भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.