मुंबई : सत्तासंघर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारलं आहे. बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आहे म्हणत त्यांनी बंड केलं. त्यांच्यासोबत बहुमत असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्घव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. सत्ता वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट आहे. 


विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांची शुक्रवारी मध्यरात्री भेट झाली. या भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


याच भेटीसाठी देवेंद्र फडणवीस मुंबईतून तर एकनाथ शिंदे मध्यरात्री गुवाहाटीतून आले होते. भाजपसोबत आल्यास सत्तास्थापनेचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत चर्चा करताना यापुढं कायदेशीर बाजू कशी मांडायची? याबाबत भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


ही भेट शुक्रवारी रात्री बडोद्यात झाल्याचं बोललं जात आहे. या भेटीमुळं आता सत्तास्थापनेसाठी भाजपच्या गोटातून हालचालींना वेग आल्याचं दिसून येतं आहे. तर आता राज्यपाल कोश्यारी काय भूमिका घेतात हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.